शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या गेवराई तालुका
गेवराई ( प्रतिनिधी ) कोरोना महामारी च्या काळात रुग्णांना वैद्यकीय मदत आणि सेवा मिळावी यासाठी शिवसेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या गेवराई तालुका समन्वयक परी धर्मराज आहेर यांची निवड करण्यात आली आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिलेल्या निवडीच्या पत्रात म्हटले आहे की, शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख तथा पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खा श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेवरून धर्मराज आहेर यांची वंदनिय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या गेवराई तालुका समन्वयकपदी सहा महिन्या करता निवड करण्यात आली आहे. या मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मदाय रुग्णालय राखीव खाटा उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रीया करण्यासंदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे, संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर रहावे. त्यासोबतच गंभीर, महागड्या शस्त्रक्रिया करायच्या असल्यास गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थसाह्य व्हावे याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहायता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट शिवसेना भवन येथील मुख्य कार्यालयास संपर्क करण्याच्या सूचनाही धर्मराज आहेर यांना देण्यात आल्या आहेत. आहेर यांना निवडीचे पत्र ना एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते बीड येथे देण्यात आले आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष गेवराई तालुका समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल धर्मराज आहेर यांचे शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, माजी सभापती युधाजित पंडीत यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
