महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

परिवर्तनाचा साक्षीदार.... पत्रकार उत्तम हजारे

*परिवर्तनाचा साक्षीदार.... पत्रकार उत्तम हजारे*

*तब्बल दीड डझन दैनिकांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पत्रकारितेचा अनुभव घेतलेले बीड येथील ज्येष्ठ पत्रकार व आमचे मित्र उत्तम हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त( दि.2 ऑगस्ट ) मुक्तचिंतन*

   पत्रकारितेचे माझे शिक्षण व प्रशिक्षण संपल्यानंतर पहिली नोकरी मिळाली ती लोकमत बीड कार्यालयात. माझा हाच जिल्हा असल्यामुळे ईथल्या राजकीय -सामाजिक चळवळीची माहिती बर्‍यापैकी होती. बीडमध्ये आठ वर्षे पत्रकारिता करीत असताना ज्या काही पत्रकार मित्रांशी स्नेहबंध जोडले गेले अशापैकी एक असलेले उत्तम हजारे. लोकाशाच्या बीड जिल्हा आवृत्तीचे प्रमुख म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. आज  उत्तमभाऊचा वाढदिवस, या निमित्ताने झुंजार पत्रकार मित्राविषयी हा शब्द प्रपंच..

  फुले -शाहू -आंबेडकरी विचारांची शिदोरी सोबत घेऊन गेल्या अडीच दशकांपासून ते माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. पत्रकारितेच्या या प्रवासात सध्या लोकाशा परिवारात ते चांगलेच रमले आहेत. लोकाशा परिवारातील हा त्यांचा दुसरा वाढदिवस. समाजाभिमुख पत्रकारितेचे एक वर्तुळ पूर्णत्वास जाताना आज दिसत आहे. नवाकाळ, पुढारी, पुण्यनगरी, झुंजार नेता, सम्राट आदी दैनिकात त्यांनी पत्रकात त्यांनी विविध पदावर कामे केली आहेत. अग्रलेखाचे बादशहा मा. निळूभाऊ खाडिलकर, पदमश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, मुरलीधर बाबा शिंगोटे, मोतीराम वरपे, बबन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची पत्रकारिता बहरली. या दैनिकांमध्ये केवळ बीडच नव्हे तर मराठवाडयाची बातमीदारी करायची संधी त्यांना मिळाली. आठ- दहा वर्षे बीड येथूनच मराठवाडयातील आठही जिल्हयातील प्रश्न पुढारी व नवाकाळमधून त्यांनी मांडले. या दैनिकांशी आजही त्यांचा स्नेह कायम आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मराठवाडा, लोकमत, चंपावतीपत्र, रिपोर्टर, सिदंफणा, पार्श्वभूमी, सोलापुर संचार, नगर सार्वमत यासह विविध दिवाळी अंकात साहित्य व विविध सदरात त्यांनी लेखन केले. अगदी सुरुवातीच्या काळात ज्येष्ठ संपादक नरेंद्र कांकरिया यांच्या संकेत व परळीच्या मराठवाडा साथी दैनिकात शिकाऊ पत्रकारिता केली. मुंबईतील एक वर्षाच्या काळात मुंबईतील विविध दैनिकाशी त्यांचा सबंध आला.

    तब्बल पंचवीस वर्ष म्हणजेच १९९५ पासून आजपर्यंत जनतेसाठी पत्रकारिता त्यांना करता आली. माध्यमे बदलती, पत्रकारितेची साधने बदलली, कोरोना-लॉकडाऊन काळात पत्रकारिता व माध्यमे संकटात आली. आता डिजीटल माध्यमाचे युग आहे, या युगातही प्रिंट मिडीया हाच विश्वास पात्र आहे, हे नव्याने सिद्ध करण्याची वेळ आली आहे. अशा वेळी अनेक दैनिकात आलेला अनुभव पाठिशी घेत लोकाशाचे मुख्य संपादक तथा समाजभूषण विजयराज बंब यांच्या मार्गदर्शनाखाली ती कार्यरत आहेत. लोकाशा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक
रोशन बंब यांनी दिलेली जबाबदारी ते पार पाडीत आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्याचे हित 
आपली जात झाले यासाठी कार्यरत राहिले आहेत. बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांचा प्रश्न रेल्वेचा प्रश्न यासह असंख्य विषयांवर त्यांनी वृत्तमालिका लिहिलेल्या आहेत. ज्या लोकशा दैनिकाचे बीड जिल्हा निवासी संपादक प्रति सांभाळत आहेत याचा मी संस्थापक राहिलेलो आहे. माझा सहकारी संतोष जोगदंड हा उत्तम आणि मला जोडणारा दुवा आहे. तर बंब साहेब म्हणजे अत्यंत दिलदार व मोठ्या मनाचा माणूस आहे. त्यांच्यासोबत दोन वर्ष मला व्यवसायिकता, धाडस व चिकाटी हे गुण  शिकता आले. बंब साहेब दररोज कार्यालयात आले काय 'प्रॉलेम' आहे, असे म्हणत असत. 'प्रॉब्लेम'चा साठी त्यांचा हा खास शब्द. शब्दाचा सोडा मात्र जगातील कुठलाही प्रॉब्लेम आला तर ते सोडवण्यासाठी लागणारा पैसा आणि धाडस या दिलदार माणसाकडे असल्याचे मी जवळून अनुभवले आहे. पत्रकारितेत शब्दांपेक्षाही आकड्यांना जास्त महत्त्व असते हे मला कळून चुकले. उत्तम हजारे यांनी बंब साहेबांची साथ प्रामाणिकपणे निभवावी. यातच त्यांची प्रगती आहे असे आम्हा मित्रांना वाटते. यातच त्यांचे सौख्य सामावलेले आहे.

  परिवर्तनवादी विचारधारा हा त्यांचा वसा आहे आणि वारसा आहे. परिवर्तन या शब्दात 'वर्तन' देखील समाविष्ट असते याची जाणीव त्यांनी विसरता कामा नये. तर अशा या पत्रकार मित्राने  शिरसमार्ग (ता. गेवराई) येथून सुरू केलेली वाटचाल आज वयाच्या पन्नाशीत पोहोचली आहे. पत्रकारीतेची पंचविशी अर्थात रौप्य महोत्सव पूर्ण झाला आहे. एक मुलगा डॉ. सुजित हजारे हा मेडीकल ऑफीसर झाला आहे तर दुसरा नोबेल हजारे हा तैवान देशात उच्च शिक्षण घेत आहे .
 पत्रकार म्हणून फार मोठा पैसा नाही मिळविता आला मात्र नावलौकिक खूप कमावला आहे. अन्य मंडळीप्रमाणे लुच्चेगिरी अन् हुजेरीगिरी उत्तमच्या रक्तातच नाही.  काही मंडळींनी तर नेत्यांच्या मागे पुढे फिरून अन् अधिकाऱ्यांची दलाली करून चांगला जमिनी - जुमला कमावला आहे. जुमलेबाजी करणे ऊत्तमला कधीच जमले नाही. 
      भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला स्वाभिमानाचा विचार हा त्यांचा श्वास आहे आणि ध्यासही.
अशाप्रकारे स्वतःसोबत समाजाचे परिवर्तन घडण्याची क्षमता असणाऱ्या या पत्रकार मित्राला वाढदिवसाच्या  मनःपूर्वक शुभेच्छा. या निमित्ताने तुमच्या अत्यंत कष्टमय जीवनाची वाटचाल म्हणताना शेवटी मजरूह सुल्तानपुरी यांच्या ओळी मला आठवत आहेत...

मैं अकेला ही चला था
जानिब-ए-मंज़िल मगर,
मगर लोग साथ आते रहे 
और कारवाँ बनता गया...

*संजय शिंदे/मुक्तसंवाद*

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ. संभाजीनगर,

--- मोबा-9579044115

-----------

(उत्तम हजारे : 94204 22018)