गेवराईतील जयप्रकाश पतसंस्थेच्या नावे मालमत्ता देण्याबाबत तहसीलदारांचे आदेश जारी
पतसंस्थेने घेतली होती उच्च न्यायालयात धाव
गेवराई, (प्रतिनिधी):- गेवराई तालुक्यातील थकीत कर्जदारांच्या व जामीनदारांच्या मालमत्तेसंबंधी जयप्रकाश पतसंस्थेने म.स.सं.अ.१९६० चे कलम १०० नियम ८५ अंतर्गत रीतसर कार्यवाही करून जिल्हा उपनिबंधक बीड यांचे कडून आदेश प्राप्त केले.सदरील प्रकरणी कायद्याप्रमाणे थकीत कर्जदारांच्या व जामीनदारांच्या स्थावर मालमत्ता पतसंस्थेच्या नावे करून पतसंस्थेला मालमत्तेच्या प्रत्यक्ष ताबा देण्याबाबत व ऋणकोंचे मालमत्तेमधील सर्व अधिकार पतसंस्थेच्या स्वाधीन करणे बाबतची कार्यवाही करणे संबंधी उपविभागीय अधिकारी बीड यांना जिल्हाधिकारी बीड यांनी प्राधिकृत केले.तदनंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी गेवराईच्या तहसीलदारांना सदर विषयी कार्यवाही करणेस्तव प्राधिकृत केले.
गेवराई येथील जयप्रकाश पतसंस्थेने दिलेल्या प्रसिद्धी पञकाद्वारे सांगितले की, तहसीलदारांनी पुढे योग्य ती कार्यवाही करणे सबंधी मुख्याधिकारी,नगरपरिषद गेवराई,गट विकास अधिकारी,पंचायत समिती गेवराई आणि संबंधित (मादळमोही, कोळगाव,सिरसदेवी,गेवराई,उमापूर, जातेगाव,धोंडराई, देवकी,तलवाडा, चकलांबा,माटेगाव,पाचेगाव व पाडळसिंगी मंडळ विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांना दि.२६/ १२/२२ रोजीच्या पत्राद्वारे आदेशित केले. तसेच दि. २६/१२ /२०२२ रोजीच्या पत्राद्वारे सदरच्या मंडळ अधिकाऱ्यांना झेड नमुना अंतर्गत थकीत कर्जदार व जामीनदारांच्या स्थावर मालमत्तेचा प्रत्यक्ष कायम ताबा मिळणे बाबत कार्यवाही करणे संबंधी तहसीलदारांनी आदेशीत केले. त्यानुसार एकूण ५२ ऋणकोंच्या कोट्यावधी रुपयांच्या ५२ स्थावर मालमत्तेच्या उताऱ्यांवर मालकी हक्कात नाव लागून जयप्रकाश पतसंस्थेस मालमत्त्यांच्या प्रत्यक्ष ताबा देण्यात येईल व अन्य ४४ ऋणकोंच्या ४४ स्थावर मालमत्तांचा झेड नमुना अंतर्गत प्रत्यक्ष ताबा आवश्यकता पडल्यास पोलिस संरक्षणात पतसंस्थेस देण्यात येईल.
याकरिता पतसंस्थेने मा.उच्च न्यायालय,मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे धाव घेऊन सदर प्रकरणी शासन-प्रशासन दरबारी लवकर कार्यवाही करण्याकरिता रिट याचिका सुद्धा दाखल केली होती.या आदेशामुळे पतसंस्थेच्या थकीत कर्ज वसुली मोहिमेस मोठे यश प्राप्त झाल्याचे बोलले जात आहे.कर्ज बुडवू इच्छिणाऱ्या थकीत कर्जदार व जमीनदारांच्या मालमत्ता हातातून जाणार असल्यामुळे त्यांना मोठी चपराक बसली आहे.इतक्या व्यापक स्तरावर अशा प्रकारची कारवाई करणारी गेवराईची जयप्रकाश पतसंस्था ही तालुक्यातील पहिली संस्था आहे.याप्रकरणी तात्काळ कर्ज भरणा करून अप्रिय कार्यवाही टाळण्याचे आवाहन पतसंस्थेच्या विशेष वसुली अधिकाऱ्यांमार्फत थकीत कर्जदार व जामीनदारांना करण्यात आले आहे.