कृष्णा शहाणे यांची माणुसकी ; जास्त आलेले 13 ग्रॅम सोने केले परत
------------------
गेवराई (प्रतिनिधी) तालुक्यातील मालेगाव खुर्द येथील सोन्याचे व्यापारी तथा नवक्रांती अर्बन बँकेचे चेअरमन कृष्णा दत्तात्रय शहाणे यांनी गेवराई येथील एका व्यापाऱ्यांकडून सोने खरेदी केले होते. यामध्ये त्यांना 13 ग्रॅम सोने जास्त आले होते ही बाब लक्षात येताच त्यांनी सदरील व्यापाऱ्याला हे सोने परत करत आपली माणुसकी दाखवली या ईमानदारीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर असे की, तालुक्यातील मालेगाव खुर्द येथे कृष्णा शहाणे यांची सोन्याची दुकान असून त्यांनी गेवराई येथील गोपिका ज्वेलर्स यांच्याकडून काही दिवसांपूर्वी सोने खरेदी केले होते. यावेळी सदरील व्यापाऱ्यांकडून त्यांना एकूण 13 ग्रॅम सोने जास्त आले होते. यानंतर शहाणे हे आपल्या दुकानात गेल्यानंतर बिल तपासत असताना ही बाब त्यांच्या लक्षात आली असता त्यांनी तात्काळ गेवराई येथे येऊन गोपिका ज्वेलर्सचे मालक जीनेंद्र चतुरमोहता यांच्या हे लक्षात आणून दिले व एकूण 60 हजार रुपये किमतीचे जास्त आलेले हे सोने परत केले. दरम्यान त्यांच्या या इमानदारी बद्दल सुवर्णकार संघटनेच्या वतीने राजेश टाक, जीनूशेठ चतुरमोहता, अमोल माळवे, मनोज मैंड, राजेश उदावंत यांच्यासह आदींनी त्यांचा विशेष सत्कार करत आभार मानत त्यांच्या इमानदारीने कौतुक केले. दरम्यान कृष्णा शहाणे यांच्या या ईमानदारीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.