वेदशास्त्र पारांगत असलेला जुन्या पिढीतील ज्ञानवंत हरवला
बीड प्रतिनिधी ।
बीड येथील संत जनीजनार्दन यांचे तेरावे वंशज आणि थोरले पाटांगणाचे मठाधिपती धुंडीराज देवीदासबुवा पाटांगणकर यांचे शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता देहावसान झाले. यावेळी त्यांचे वय ८२ वर्षाचे होते. त्यांच्या जाण्याने एक जुन्या पिढीतील ज्ञानवंत आणि धर्मशास्त्रातील आधारवड हरवला आहे. पाटांगणकर महाराज यांच्या पार्थीवावर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता शहरातील मोंढा भागातील अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बीड शहरातील पाटांगण गल्लीतील संत जनीजनार्दन संस्थानचे मठाधिपती धुंडीराज देवीदासबुवा पाटांगणकर हे जिल्हा परिषदेचे शिक्षक होते.वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. १९६८ मध्ये संत जनीजनार्दन संस्थानचे मठाधीपती म्हणून संस्थानचे काम पाहु लागले. कीर्तन, प्रवचन, धर्मशास्त्र , पंचांगाच्या माध्यमातून त्यांनी संस्थानचा प्रचार प्रसार करत राज्यभर शिष्य जोडले. वेदावर प्रभुत्व असलेल्या धुंडीराज शास्त्री पाटांगणकर हे आयुर्वेदातील ओषधे देत होते. त्यामुळे त्यांनी बीडमध्ये तळागाळातील सामान्य माणुस आपल्याशी जोडला होता. बीड शहरात यज्ञ यागाबरोबरच प्रत्येक धार्मीक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता.थोरल्या पाटांगणावरील चातुर्मास समाप्ती उत्सव ,संत जनीजनार्दन पुण्यतिथी कार्यक्रम ,अन्नदान त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाले. मागील तीन दिवसापासुन पाटांगणकर महाराज यांची तबीयत बिघडल्याने त्यांना बीडच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान शनिवारी दुपारी पुढील उपचारासाठी त्यांना औरंगाबाद येथे नेत असतांना वाटेतच शहागड जवळ त्यांची प्राण ज्योत मालवली. पाटांगणकर महाराज यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन , नातवंडे, दोन मुली, एक भाऊ असा परिवार आहे.
----------
रविवारी सकाळी साडेनऊ वाजता अंत्यसंस्कार
वेदशास्त्र संपन्न धुंडीराज शास्त्री पाटांगणकर यांचे पार्थिव शनिवारी सायंकाळी थोरले पाटांगण येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या देहावसाचे वृत्त समजाताच बीड शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शिष्य, सामान्य नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. दरम्यान आज रविवार १७ जुलै २०२२ सकाळी साडेनऊ वाजता शहरातील अमरधाम स्मशानभुमीत पाटांगणकर महाराज यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.