खुनातील आरोपीच्या अटकेसाठी मयताच्या नातेवाईकांचा रास्ता रोको
----------------------------------------
पोलीस प्रशासनाच्या विरोधात गेवराईत संताप
गेवराई (प्रतिनिधी) गेवराई शहरामध्ये काल दोन गटात मारामार्या झाल्या. यात एका 24 वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. या घटनेने गेवराई शहरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी यातील आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही. आरोपीच्या अटकेसाठी मयताच्या नातेवाईकांनी आज उपजिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या मांडून महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा आक्रमक पावित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला होता.
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. दोन दिवसाला कुठे ना कुठे गंभीर घटना घडत आहे. दोन दिवसांपूर्वी बीड शहरातील खंडेश्वरी परिसरात दिवसाढवळल्या एका तरुणाची हत्या करण्यात आली होती तोच रात्री गेवराई शहरामध्ये एका तरुणाचा खून झाला. दोन गटात झालेल्या वादावादीतून तरुणाला जिवे मारण्यात आले. बाबू शिवराम शेनोरे (वय 24 वर्षे) याचे व अन्य काही जणांचे भांडण झाले होते. या भांडणातून शेनोरे यांचा खून करर्यात आला. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अद्यापही अटक करण्यात आली नाही. आरोपीच्या अटकेसाठी मयताच्या नातेवाईकांनी आक्रमक पावित्रा घेत उपजिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या मांडून महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे नातेवाईकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.