कथालेखकांनी सभोवतालच्या माणसांच्या अंतरंगाचे वाचन करावे : प्रा. बापू घोक्षे
_____________________
गेवराई, (प्रतिनिधी) - कथालेखकांनीआधी सभोवतालच्या माणसांचे अंतरंग वाचावे आणि ते त्यांच्या कथांमधून उमटले पाहिजे, असे प्रतिपादन नाटककार प्रा. बापू घोक्षे यांनी केले.
स्फूर्ति कलाअकादमीच्या 'स्व. प्रा. दिनेश माने कथाकथन स्पर्धेच्या' पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. आॕनलाईन पध्दतीने संपन्न झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाटककार अॕड. कमलाकर देशमुख हे होते.
याप्रसंगी प्रा. बापू घोक्षे पुढे म्हणाले की, वास्तव जीवन चित्रण करणारी कथाच शाश्वत कथा ठरत असल्यामुळे कथेमध्ये जास्तीत जास्त मानवी आंतररंगांचे चित्रण झाले पाहिजे.
या कथाकथन स्पर्धेचे परीक्षक म्हणून देखील प्रा. बापू घोक्षे यांनी काम बघितले. स्पर्धेतील कथांविषयी बोलतांना ते म्हणाले की, या सर्व कथाकथन व्हिडिओंचे मी केंद्रीय युवक महोत्सवाच्या निकषांप्रमाणे तपासणी केलेली आहे. जेणेकरून कुठल्याही स्पर्धकावर अन्याय होणार नाही. याच पद्धतीने दिलेला हा निकाल आहे. पुढे बोलतांना ते म्हणाले कथाकथनात व्यक्तिरेखा या जिवंत वाटण्यासाठी त्यातील बारकावे हि सादर करता येणे गरजेचे आहे. बरेचदा कथाकथन व एकपात्री प्रयोग यांच्या सादरीकरणात गल्लत होऊ शकते, असे सांगून प्रा. बापू घोक्षे म्हणाले की, हे दोन्ही प्रकार स्वतंत्र असून कथाकथनामध्ये संपूर्ण घटना-प्रसंग जिवंत उभे करण्याचं कसब सादरकर्त्याला ओतावे लागते.
ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ते स्वर्गीय प्रा. दिनेश माने यांच्या काही स्मृती त्यांनी यावेळी उपस्थितांसमोर ऑनलाइन पद्धतीने सांगितल्या. या मनोगतामध्ये सर्वस्पर्शी मत व्यक्त करून स्पर्धक, आयोजक आणि उपस्थित मान्यवर - रसिक श्रोत्यांचे मन जिंकले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अॕड. कमलाकर देशमुख यांनी देखील आपले विचार मांडले.
ऑनलाइन प्रकारातील बीड जिल्ह्यातील साहित्यप्रकारातील हा पहिलाच उपक्रम असल्याने सर्व स्तरातून याचे कौतुक होते आहे.
या सोहळ्याच्या प्रारंभी सिनेदिग्दर्शक डॉ. सुधीर निकम यांनी प्रास्ताविक केले तर आभार ज्ञानेश्वर मोटे यांनी मानले. कार्यक्रमास 'स्फूर्ति अकादमीचे संस्थापक प्रकाश भुते, संयोजक , प्रशांत रुईकर, शिवाजीराव गायकवाड, सिनेदिग्दर्शक प्रविण वडमारे, सिनेलेखक एजाज अली आदी मान्यवरांसह स्पर्धक, रसिक आणि स्फूर्तिचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
