एसटीची मुंबई बेस्ट सेवा बंद करा
-------- हनुमान ताटे
बीड प्रतिनिधी
रा. प. महामंडळातर्फे माहे सप्टेंबर २०२० पासून मुंबई येथील बेस्टची वाहतूक करण्यात येत आहे. बेस्टची वाहतूक सुरू केल्यापासून रा.प.कर्मचाऱ्यांच्या गैरसोयींबाबत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने एसटी प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कायमस्वरूपी सुधारणा झालेल्या नाहीत. त्यामुळे एसटी प्रशासनाने एक तर कर्मचाऱ्यांना सुविधा द्याव्यात अन्यथा एसटीची मुंबई बेस्ट सेवा बंद करावी असे एका पत्राद्वारे संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमान ताटे व अध्यक्ष संदीप शिंदे यांनी एसटीचे उपमहाव्यवस्थापक यांना दिलेल्या पत्रात केली आहे.
बेस्ट वाहतुकीकरिता दुर्धर आजार व ५५ वर्षावरील कर्मचारी पाठविण्यात येऊ नयेत अशा सूचना असतानाही स्थानिक पातळीवर अशा कर्मचाऱ्यांना बेस्ट वाहतुकीला जाण्यासाठी जबरदस्ती केली जाते, न गेल्यास आरोपपत्र, निलंबन, इ. प्रकारच्या शिक्षा दिल्या जातात. बेस्ट वाहतूकीला पाठविताना सॅनिटायझर, मास्क पुरविले जात नाहीत, एका बस मधून ४० ते ४५ कर्मचारी आगारातून मुंबईला पाठविले जातात. याठिकाणी सोशल डिस्टंसिंग पाळले जात नाही, बेस्ट वाहतुकीवरून आल्यावर काही ठिकाणी कोरोना टेस्ट केली जात नाही. टेस्ट केल्यास रिपोर्ट येईपर्यंत विलगीकरण केले जात नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाची बाधा होते.
तरीही एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवा म्हणून जिवावर उदार होऊन आपली सेवा बजावत आहेत.
मा.परिवहन मंत्री महोदय एस.टी.कर्मचाऱ्यांचा “कोरोना योद्धा” म्हणून मोठ्या अभिमानाने उल्लेख करतात. मात्र या योद्धाच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष केले जात आहे.ही बाब अतिशय गंभीर आहे. मुंबई बेस्ट सेवा करताना एसटी कर्मचाऱ्यांना अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण व राहण्याची अत्यंत गैरसोय असून एका रूम मध्ये पाच-पाच, सहा-सहा कर्मचारी ठेवले जातात.त्यामुळे कोरोना संसर्ग वाढीस चालना मिळत आहे. तसेच जे कर्मचारी कोरोनाने मृत झाले आहेत, त्या सर्वच कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा कवचाची रक्कम मिळालेली नाही, अनुकंपा तत्त्वावर अद्याप नोकरी मिळालेली नाही. जेवणासाठी जो भत्ता दिला जातो तो सुद्धा अपुरा असून सध्या हॉटेल व्यवसाय बंद असल्याने कर्मचार्यांना नाश्ता, जेवण सुद्धा मिळतांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
बेस्ट वाहतुकीसाठी मुंबईत आल्यावर जर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाला तर त्याच्यावर मुंबईत उपचार न करता परत गावी पाठविले जाते ही अतिशय गंभीर बाब आहे व शासकीय नियमांचे उल्लंघन करणारे आहे. मुंबई येथे बेस्ट वाहतुकीसाठी कर्मचाऱ्यांना पाठवण्यापूर्वी लसीकरण करणे आवश्यक असताना ते केले जात नाही. मुंबई बेस्ट वाहतुकीमुळे अनेक कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. तर काही कर्मचारी मृत पावले आहेत. रा.प.कर्मचाऱ्यांचा थेट संपर्क प्रवाशी जनतेशी येत असल्याने त्यांना कोरोना होण्याचा धोका अधिक प्रमाणात असल्याने त्यांचे प्राधान्याने लसीकरण करणे अत्यावश्यक आहे.परंतु ते केले जात नाही .
या कारणाने कर्मचाऱ्यांमध्ये बेस्ट वाहतुकीसंदर्भात एक प्रकारची भीती व चीड निर्माण झाली आहे.तरी वरील सर्व बाबींची दहा दिवसात पूर्तता करण्यात यावी अन्यथा एसटीची बेस्ट सेवा बंद करावी असे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने एसटीचे उपमहाव्यवस्थापक ,मुंबई यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे .
अशी माहिती बीड विभागाचे प्रसिद्धीप्रमुख *ज्ञानेश्वर चातुर* यांनी दिली आहे .
