प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपले भविष्य उज्वल करा- श्री प्रमोद गोरकर
जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर,गढी येथील माजी विद्यार्थी समितीच्या वतीने माजी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभांतर्गत कु.अश्विनी चंद्रसेन उबाळे या माजी विद्यार्थिनीची पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झाल्याबद्दल सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी श्री. प्रमोद गोरकर तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे हे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्तेअश्विनी उबाळे हिचा सत्कार संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलताना श्री प्रमोद गोरकर यांनी सांगितले की अश्विनी उबाळे हिने प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण याच शिक्षण संस्थेमध्ये घेतलेले आहे. आणि आज तिने जे यश संपादन केले आहे यामागे तिची जिद्द, अपार कष्ट, चिकाटी व प्रामाणिक प्रयत्न आहेत. तिने महाविद्यालयाचे नव्हे तर संपूर्ण संस्थेचे नाव उज्वल केले आहे. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी तिचा आदर्श घेऊन मार्गक्रमण केले तर यश तुमच्या पाठीशी निश्चित राहील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे हे बोलताना म्हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे
कोणतेही ध्येय गाठणे साधेसरळ नसते त्यासाठी तुम्हाला खडतर मेहनत घ्यावी लागते.आपल्या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी आज वकील, प्राध्यापक, शिक्षक,उद्योजक, पोलीस,अभिनेता, ड्रेस डिझायनर,आरोग्य कर्मचारी अशा सर्व हुद्द्यांवर यशस्वीरित्या कार्य करत आहेत तुम्ही त्यांचा आदर्श घेऊन आपल्या मेहनतीच्या जोरावर आपले जीवन यशस्वी करू शकता. आपले मनोगत व्यक्त करताना कु.अश्विनी ऊबाळे म्हणाली की, अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून मार्गक्रमण करत आज मी हा यशाचा टप्पा गाठला आहे. माझ्या यशामध्ये माझी स्वतःची मेहनत तर आहेच पण यामध्ये माझ्या आईवडिलांचे अपार कष्ट, त्यांची मुलांप्रति शिस्त व योग्य संगोपन पद्धती तसेच शालेय व महाविद्यालयीन स्तरावर मिळालेले गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन यांचा समावेश आहे. कोणतेही आई-वडील आपल्या मुलांसाठी कष्ट घेत असतात तुम्ही त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून कोणत्याही प्रकारच्या वाईट संगतीला न लागता एकाग्रतेने ध्येयाच्या दिशेने जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. जयराम ढवळे,प्रास्ताविक प्रा. डॉ. अयोध्या पवळ ,तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. कलंदर पठाण यांनी केले. यावेळी माजी विद्यार्थी समिती प्रमुख संतोषकुमार यशवंतकर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.