गेवराई नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी नगर पालिका प्रशासनच्या
सहाय्यक आयुक्त नीता अंधारे यांची नियुक्ती
गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर पालिका प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त नीता आशा अंधारे यांची दिनांक 11 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी नियुक्ती केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांची बदली होऊन ते बीड नगर परिषदेला मुख्याधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर, माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे गेवराई नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला होता. परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या 92 नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी असणे गरजेचे असल्याने, माजलगावच्या विशाल भोसले यांच्याकडील गेवराई नगर परिषदेचा पदभार काढण्यात आला आहे. गेवराई नगर परिषदेची निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांच्या जागेवर दिनांक 11 जुलै 2022 रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर पालिका प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त नीता आशा अंधारे यांच्याकडे गेवराई नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. सदर नियुक्ती जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केली आहे.