ज्यांना कारखान्याचा ‘क’ कळत नाहीत्यांना जय भवानीवर टिका करण्याचा अधिकार नाही
==========
गळीत हंगाम सांगता समारंभ प्रसंगी चेअरमन अमरसिंह पंडित यांचे प्रतिपादन
==========
हलगीच्या तालावर संचालकांसह पदाधिकार्यांनी धरला ठेका
==========
अतिशय उत्साहात जय भवानीच्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ संपन्न
==========
गेवराई, (प्रतिनिधी) ः- चेअरमनच्या खुर्चीवर बसून कधीही बेईमानी केली नाही, ऊसाचे घाणेरडे राजकारण जय भवानीवर झाले नाही. यावर्षी अतिरिक्त ऊस असतानाही कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊसाचे गाळप करून जय भवानीने उच्चांकी गाळपाचा नवीन विक्रम केला. शेतकर्यांचा ऊस बांधावर पडावा यासाठी विरोधकांनी अक्षरशः देव पाण्यात ठेवले, ज्यांना कारखान्याचा ‘क’ कळत नाही त्यांना जय भवानीवर टिका करण्याचा अधिकार नाही असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले. अतिशय उत्साहाच्या वातावरणात ३९ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ पार पडला, यावेळी ते बोलत होते.
जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या ३९ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ कारखाना साईटवर अतिशय उत्साहात संपन्न झाला, यावेळी कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित, श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथगड संस्थानचे महंत ह.भ.प. जनार्धन महाराज, माजी चेअरमन जयसिंग पंडित, व्हा.चेअरमन जगन्नाथ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जय भवानीने ६ लाख १९ हजार मे.टन ऊसाचे गाळप करून उच्चांकी गाळपाचा नविन विक्रम केल्यामुळे गाळप हंगामाच्या सांगता समारंभप्रसंगी सर्वजन अतिशय उत्साहात होते. हलगीच्या तालावर यावेळी संचालक आणि पदाधिकार्यांनी ठेका धरत आनंद व्यक्त केला. चेअरमन अमरसिंह पंडित यांनी कारखाना कर्मचार्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून जाहिर केला, त्याचे उपस्थित कर्मचार्यांनी जल्लोषात स्वागत केले.
चेअरमन अमरसिंह पंडित बोलताना म्हणाले की, जय भवानीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी कारखाना यंत्र सामुग्रीमध्ये अत्याधुनिक बदल करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरु होत आहे. पुढील वर्षी कारखान्याची गाळप क्षमता वाढविली जाणार असून प्रतिदिन ५ हजार मे.टन ऊसाचे गाळप करण्याचा प्रयत्न राहणार आहे. कारखान्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्नशील असून काटकसरीने कारखाना चालविताना अनेकांची मने दुखावली जाणार आहेत याची मला जाण आहे, परंतु कारखान्याच्या उज्वल भविष्यासाठी या खुर्चीवर बसून कोणाशीही बेईमानी करणार नाही असेही त्यांनी सांगितले.
आपल्या भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेताना अमरसिंह पंडित म्हणाले, जय भवानीला ऊसाची गरज असताना ज्यांनी बँड लावून तालुक्यातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना पाठविला त्या कारखान्यांनी शेतकर्यांचे पैसे दिले का ? विरोधकांनी अनेक कारखान्यांची कार्यालये स्वतःच्या जागेत सुरु करून शेतकर्यांच्या ऊसात दलाली केली, सुमारे १८ कारखान्यांनी आजवर गेवराई तालुक्यातील ऊस गाळपासाठी नेला मग यावर्षी अतिरिक्त ऊस झाल्यानंतर विरोधकांनी बाहेरच्या कारखान्यांना तालुक्यातील ऊस का दिला नाही ? ज्यांना कारखान्याचे ‘क’ कळत नाही त्यांना जयभवानीवर बोलण्याचा अधिकार नाही यावर्षी जयभवानी चांगला चालला, उच्चांकी गाळप केले, तालुक्यात ऊस शिल्लक राहिला नाही, म्हणून या विरोधकांना जय भवानी शाप वाटतो, हे लोक शेतकर्यांचा ऊस बांधावर पडावा म्हणून देव पाण्यात ठेवून होते, मात्र जय भवानीच्या कृपेने शेवटच्या ऊसापर्यंत आम्ही गाळप करून तालुक्यातील सर्व ऊस गाळप करू शकलो याचे यावेळी समाधान त्यांनी व्यक्त केले.
चेअरमन अमरसिंह पंडित यांनी ऊस बागायतदार, ऊस तोडणी मजुर, कामगार, कर्मचारी, अधिकारी, तोडणी वाहतुक ठेकेदार यांच्यासह जयभवानीच्या हितचिंतकांचे आभार व्यक्त केले. महंत जनार्धन महाराज यांनी आशिर्वादपर भाषण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांनी केले तर आभार कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप यांनी मानले. कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती जगनपाटील काळे, उपसभापती शाम मुळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, संचालक पाटीलबा मस्के, कुमारराव ढाकणे, सुनिल पाटील, अनिरुद्र तौर, श्रीराम आरगडे, शांतीलाल पिसाळ, नंदकिशोर गोर्डे, पांडुरंग कोळेकर, शामकाका येवले, बाबुराव काकडे, आवेजसेठ, कैलास नलावडे, अप्पासाहेब गव्हाणे, रोहिदास चव्हाण, जगनपाटील, विकास सानप, संदिपान दातखीळ, बंडूसेठ मोटे, साहेबराव पांढरे, मुजीब पठाण, भास्कर खरात आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणार्या कर्मचारी, ऊस तोडणी मुकदम, वाहतुक ठेकेदार, कामगार यांचा रोख रक्कम देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महादेव चाटे यांनी केले.
