श्री.क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान येथे रामकथेची भक्तीमय वातावरणात उत्साहात सांगता
----------------------------------------
जीवनात प्रत्येकाने रामकथा ऐकली पाहिजे
रामायणाचार्य समाधान महाराज शर्मांच्या अमृततुल्य वाणीने भाविक मंत्रमुग्ध
गेवराई: (शुभम घोडके) जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर रामकथेत मिळते म्हणून प्रत्येकाने रामकथेच्या ज्ञान मंडपात येवून रामकथेच्या श्रवणाचा लाभ घ्यावा.तर घरातील एकता टिकवून ठेवायची असेल तर भावा-भावा मध्ये प्रेम असले पाहिजे आणि त्यासाठी जीवनात प्रत्येकाने रामकथा ऐकली पाहिजे.तर हनुमंताची भक्ती आणि प्रभु श्रीरामचंद्र यांची शक्ती हे नाते महान आहे.प्रभु श्रीरामचंद्र हे एकवचनी, एकबाणी, एकपत्नी असे प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम होते.असे प्रतिपादन सुप्रसिद्ध रामायणाचार्य संगीत तुळशी रामकथा प्रवक्ते समाधान महाराज शर्मा यांनी व्यक्त केले.
श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान कुंभेजळगाव, (ता.गेवराई) येथे वै.ब्रम्हनिष्ठ गुरुवर्य महंत वामन महाराज गिरी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त ह.भ.प महंत दत्ता महाराज गिरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रामायणाचार्य सुप्रसिद्ध रामकथा प्रवक्ते ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांच्या सुमधूर वाणीतून रविवार दि.२२ जानेवारी पासून सुरु असलेल्या संगीत तुळशी रामकथेची दि.२७ जानेवारी रोजी भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी गोरक्षनाथ गडाचा परिसर भक्तीमय वातावरणाने फुलून गेला होता.यावेळी संस्थानाचे महंत दत्ता महाराज गिरी, पंचमुखेश्वर संस्थानचे महंत महादेव महाराज, ह.भ.प. परमेश्वर वाघमोडे सह आदी संत- महंत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
रामकथेच्या सांगता सोहळ्याप्रसंगी बोलताना समाधान महाराज शर्मा म्हणाले की भगवान परमात्मा आजही पृथ्वीतलावर वास्तव्यास आहेत. फक्त त्यांच्या दर्शनासाठी तेवढी शुध्दी लागते म्हणून दर्शन घेताना बुध्दीने नाही तर शुध्दीने दर्शन होत असते. देव उपासाने नाही उपासनेने मिळतो. तर रामकथेत सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात सर्वांनी आपल्यातील अहंकार काढून टाकावा. भावा-भावात एकमेकांशी प्रेमाने वागावे. गोरक्षनाथ गडावर माझी निष्ठा आणि प्रेम आहे.तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कायम राम नावाचा जप करावा असा मौलिक सल्लाही शेवटी बोलताना त्यांनी दिला.यावेळी त्यांना संतोष शर्मा, सागर कांबळे,बाळकृष्ण,भागवत शिरपुले यांची साथ लाभली. शेवटी आरतीने भव्य रामकथेची उत्साहात सांगता झाली. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती.